नाशिक : शेकडो महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीचा आरोप असलेला नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. पहिल्या गुन्ह्यातील कोठडी संपल्यानंतर, दुसऱ्या बलात्कार प्रकरणात त्याला आज न्यायालयाने 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव खरातला न्यायालयात प्रत्यक्ष हजर न करता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे हजर करण्यात आले होते.
अशोक खरातवर असलेल्या जनक्षोभाचा विचार करता, (विशेष तपास पथक) कडून त्याला प्रत्यक्ष कोर्टात आणणे जोखमीचे होते. त्यामुळे तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांनी केलेल्या अर्जानंतर न्यायालयाने द्वारे सुनावणीला परवानगी दिली. कोर्ट रूममध्ये चार मोठ्या स्क्रीन लावण्यात आल्या होत्या, ज्याद्वारे आरोपी खरात, न्यायाधीश आणि कोर्टातील कामकाज एकमेकांना दिसत होते.
न्यायालयात सरकारी पक्षाचा खळबळजनक युक्तिवाद
सुनावणीदरम्यान सरकारी वकील ॲड. शैलेंद्र बागडे आणि तपास अधिकाऱ्यांनी खरातच्या कृत्यांचा पाढा वाचला. खरातने आमिष दाखवून पिडितेवर अत्याचार केला, ज्यामुळे ती गर्भवती राहिली. त्यानंतर त्याने तिला काही गोळ्या आणि जडीबुटीचे औषध देऊन तिचा गर्भपात घडवून आणला. या गोळ्या कुठून आणल्या आणि त्या औषधात काय होते, याचा तपास करणे बाकी आहे. खरात पिडितेला ङ्गङ्घतू अप्सरा आहेसङ्घङ्घ असे सांगून भुरळ घालत असे आणि तिचे शोषण करत असे. खरात पिडितेच्या नातेवाईकांकडून आधार कार्ड आणि पॅन कार्डची मागणी करत होता. यामागे त्यांची मालमत्ता हडपण्याचा कट होता का? याचाही तपास करत आहे.
न्यायाधीशांसमोर खरातची अवस्था
पिंक रंगाचा टी-शर्ट, वाढलेली दाढी आणि दोन्ही हातावर हात धरून उभा असलेला अशोक खरात स्क्रीनवर दिसत होता. न्यायाधीश बी. एन. ईचपुरानी यांनी त्याला विचारले की, तुम्हाला काही सांगायचे आहे का? त्यावर खरातने नाही असे उत्तर दिले. आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचा दावाही सरकारी पक्षाने केला.
बचाव पक्षाचा दावा
खरातच्या वकिलांनी 7 दिवसांच्या कोठडीला विरोध केला. ही घटना 2022 मधील असून याआधी 14 दिवस कोठडी झाली आहे, त्यामुळे पुन्हा कोठडीची गरज नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला. मात्र, गुन्ह्याचे गांभीर्य आणि मास्टरमाईंड खरातची मोडस ऑपरेंडी लक्षात घेता न्यायालयाने त्याला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.